बालयोगी सदानंद महाराज यांनी वयाच्या बाराव्या वर्षी सर्वास्वाचा त्याग करून एकांतवासासाठी तुंगारेश्वर या पवित्र व जागृत देवस्थानात वृक्षवल्ली आणि डोंगरदऱ्यांच्या साक्षीने दिर्घकाळ वास्तव्य करुन आपली साधना केली. सदानंद महाराजांचे वडील वैजनाथ आणि आई पार्वती यांना संतसमागम, तीर्थयात्रा व साधुसंतांच्या भेटीची आवड होती. या दांम्पत्याला अपत्यसुख नव्हतं. परंतु त्यांची मनोमन इच्छा होती की, आपल्याला असा पुत्र व्हावा, जो आध्यात्मिक कार्य करुन समस्त मानवजातीचं कल्याण करील. योगायोगानं तसंच पूर्व संचिताने हे महान योगी परमपूज्य स्वामी नित्यानंद महाराजांच्या संपर्कात आलं. तेव्हा नित्यानंद स्वामींनी या दांम्पत्याच्या मनातील इच्छा ओळखली व त्यांना स्वप्नात दृष्टांत देऊन आशिर्वाद दिला की, ‘तुम्हाला मुलगा बारा वर्षानंतर मात्र तो तुमचा राहणार नाही. परंतु तुम्हाला व अखिल मानवजातीला नित्य आनंद देईल!’ नित्यानंद स्वामींच्या दृष्टांतरुपी आशिर्वादाने शुक्रवार, २१ ऑगस्ट १९५८ रोजी पहाटे ब्रम्हमुहूर्तावर पहाटे ३ वाजून १० मिनीटांनी बाल सदानंद यांचा जन्म झाला. लहानपणापासून त्यांचा ओढा वैराग्याकडे होता. बाबा लहानपणापासून सात्विक आहार घेत व स्वच्छ राहत. शाळेत दुसरीपर्यंत कासोटी नेसून जात. केसांचा बुचडा बांधून अवलियासारखे उघडे, स्वच्छंदी राहत असत. मनात येईल तेव्हा मारूती किंवा राम मंदिरात जाऊन ध्यानस्थ होत असत. त्यांच्या अशा वागण्याने लोक त्यांना वेडा म्हणत. वयाच्या दहाव्या वर्षी सदानंद बाबांच्या लक्षात आलं की, ध्यान धारणेसाठी एकांतवासच हवा. तसचं साधना करण्यासाठी झाडं, पानं, निर्झर, गिरीशिखरं यांच्या सहवासात गेलं पाहिजे. कारण निसर्ग स्थितप्रज्ञासारखा असून सर्वांना समृदृष्टीने पाहतो. शिवाय माणसाचा दृष्टीकोन बदलण्याची प्रचंड शक्ती निसर्गात सामावलेली आहे. त्यामुळे वयाच्या बाराव्या वर्षी सदानंद बाबांनी २६ एप्रिल १९७१, अक्षय्यतृतीया या दिवशी आपल्या राहत्या घराचा त्याग केला आणि तुंगारेश्वरचं जंगल तप व साधनेसाठी निवडलं. तिथे सदानंद महाराजांच्या पुढील साधनेचा प्रारंभ झाला. या साधनेद्वारे बाबांनी बऱ्याच सिध्दी अवगत केल्या आणि आपल्या या सामर्थ्याचा उपयोग समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी करण्याचं त्यांचं कार्य अविरत सुरु आहे.